Sunday, July 12, 2009

आव्हान मातामृत्यू रोखण्याचे

आव्हान मातामृत्यू रोखण्याचे
डॉ. अंजली राडकर
Thursday, January 22nd, 2009 AT 8:01 PM

संयुक्त राष्ट्रांनी सप्टेंबर २००० मध्ये नव्या सहस्रकासाठी विकासाची उद्दिष्टे (मिलेनिअम गोल्स) ठरवली आहेत. दारिद्य्र निर्मूलन, प्रत्येकाला किमान प्राथमिक शिक्षण, लिंगभाव कमी करणे, महिलांचे सबलीकरण, बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे, एड्‌स-मलेरियाशी मुकाबला करणे, पर्यावरणाची हानी टाळत शाश्‍वत विकास साध्य करणे आणि विकासासाठी साऱ्या देशांनी एकत्र येणे.. अशी आठ उद्दिष्टे निश्‍चित करण्यात आली आहेत.
सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेला मातामृत्यूचा विषय हा "मिलेनिअम गोल्स'चा एक भाग आहे. विकसनशील आणि गरीब देशांना हा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. मातामृत्यू म्हणजे स्त्रीचा गरोदरपणात, प्रसूतीच्या वेळी अगर प्रसूती किंवा गर्भपातानंतर ४२ दिवसांत होणारा मृत्यू. मात्र मातामृत्यू ठरण्यासाठी मृत्यूचे कारण मूल होण्याशी निगडित असायला हवे. एक लाख जिवंत जन्मामागे किती मातांचा मृत्यू होतो, यावरून मातामृत्यू दर काढला जातो. हे प्रमाण २००७ मध्ये दोनशेपर्यंत आणि २०१५ मध्ये १०९ पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट भारतासमोर होते. "युनिसेफ'च्या ताज्या अहवालानुसार २००० ते २००७ या काळात मातामृत्यूचे भारतातील प्रमाण ४५० आढळून आले आहे. म्हणजेच २००७ मध्ये ते दोनशेपर्यंत खाली आणणे शक्‍य झालेले नाही. हे उद्दिष्ट आता गाठायचे असेल, तर मातामृत्यूदर दर वर्षी ५०५ टक्‍क्‍यांनी खाली आणायला हवे; पण तो फक्त एक टक्‍क्‍याने खाली गेला आहे. सन २०१५ मध्ये मातामृत्यूचे प्रमाण १०९ पर्यंत खाली आणावयाचे आहे.
त्यासाठी तर आपल्याला खूप वेगाने काम करण्याची गरज आहे. जबाबदारी विकसनशील देशांची वास्तविक मातामृत्यू म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील घटनाक्रमाचे फलित. स्त्रीच्या बाबतीत सारे काही सुरळीत घडत गेले, तर जवळजवळ सर्वच मातामृत्यू थांबवणे तत्त्वतः शक्‍य आहे; पण तसे होत नाही. मातामृत्यू कमी असणे हा सार्वजनिक आरोग्याचा; तसेच एकूणच विकासाचा महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो आणि त्याची विकसित आणि विकसनशील देशांमधील दरी फार मोठी आहे.
विकसनशील देशांचा मातामृत्यू दर विकसित देशांच्या माता मृत्यूदरापेक्षा दोनशे पटींनी अधिक आहे. जगातील एकूण मातामृत्यूंपैकी ९९ टक्के मातामृत्यू विकसनशील देशांत होतात. त्यामुळे मातामृत्यू कमी करण्याची जबाबदारी विकसनशील देशांवर आहे. भारतासारख्या देशात एकूणच अचूक आकडेवारी मिळणे अवघड आणि त्यातून मृत्यूंची तर फारच अवघड! घडून गेलेली घटना आणि आता त्या माहितीचा काय उपयोग, अशीच भावना असते. त्यातच मातामृत्यू हा संवेदनशील किंवा फारसे न बोलण्याचा विषय. त्यामुळे जरी हा दर; तसेच मातामृत्यूंची संख्या मोठी असली, तरी त्याविषयी अचूक आणि आवश्‍यक माहिती उपलब्ध नाही. एखादा अभ्यास करून माहिती मिळवावी, तर त्यासाठी लागणारा नमुनाही मोठा असणार. त्यामुळे तेही जवळपास शक्‍य नाही. तरीही निरनिराळ्या माहिती स्रोतांतून मिळणारी माहिती संकलित करून याबाबतचा पट मांडता येतो. "माता आणि बालआरोग्य - २'च्या माहितीनुसार आपल्याकडे एकूण मातामृत्यूंपैकी ४० टक्के मृत्यू गरोदरपणाच्या काळात होतात; १६ टक्के प्रसूतीच्या वेळी आणि ३४ टक्के प्रसूतीनंतरच्या ४२ दिवसांत. याखेरीज १० टक्के मृत्यू हे असुरक्षित गर्भपातामुळे होताना दिसतात. अवघड गरोदरपण किंवा प्रसूती, गर्भाशयाबाहेर होणारी गर्भधारणा, उच्च रक्तदाब आणि त्याच्या अनुषंगाने होणारे आजार, प्रसूतीच्या वेळेस अथवा प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव, कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग आणि त्याचे होणारे दुष्परिणाम, याखेरीज मधुमेह, ऍनिमिया, मलेरिया, हृदयरोग आदी कारणांमुळे मातामृत्यू होतात. मातामृत्यूची वेळ आणि कारणे पाहता काही गोष्टी सहजपणे लक्षात येतात.
समाजातील सर्व स्तरांतील गर्भवती स्त्रियांपर्यंत प्रसूतिपूर्व सेवा पोचल्या पाहिजेत. गरोदर स्त्रीला धनुर्वाताची तीन इंजेक्‍शने दिली, पहिल्या तिमाहीत पहिली प्रसूतिपूर्व तपासणी झाली, नंतर किमान तीन तपासण्या झाल्या आणि तिने लोहाच्या किमान शंभर गोळ्या घेतल्या, तर तिला पूर्ण प्रसूतिपूर्व सेवा मिळाली, असे मानतात. अशी प्रसूतिपूर्व सेवा मिळाल्यास गर्भवती स्त्रीचे सर्व आजार, प्रसूतीच्या वेळी येणाऱ्या संभाव्य अडचणी; तसेच तिचा "ऍनिमिया' या सर्वांचा आधीच विचार होऊ शकेल आणि या साऱ्यांतून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गही मिळेल. त्यामुळे गरोदरपणात होणाऱ्या मृत्यूंना आळा घालता येईल. "बाळंतपण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसूतिपूर्व तपासण्यांची; तसेच दवाखान्यात प्रसूत होण्याची जरुरी नाही,' असा समज असणारा खूप मोठा गट अजूनही आपल्या देशात आहे. ज्यांचे बाळंतपण घरीच झाले आहे, अशा तीन चतुर्थांशाहून अधिक स्त्रियांनी हे मत तिसऱ्या "राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणा'त व्यक्त केलेले आहे. त्यांचा हा समज खोडून काढला पाहिजे. घरीच बाळंतपण करण्याचा आग्रह असेल, तर अशा स्त्रियांसाठी आरोग्य सेवेमार्फत एक सुरक्षित प्रसूती संच पुरविण्यात येतो. त्यात स्वच्छ आणि निर्जंतुक सामग्री असते. त्यामुळे ही सामग्री वापरून केल्या गेलेल्या बाळंतपणात जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता कमी होते; तसेच प्रसूतीनंतर होणाऱ्या त्रासापासून स्त्रीची सुटका होऊ शकते. अशा प्रकारे मातामृत्यू कमी करता येतील.
प्रसूतीनंतर स्त्रीची तपासणी आणि विचारपूस केल्यामुळे स्त्रीकडे त्या काळात केवळ दुर्लक्ष झाल्यामुळे होणारे मातामृत्यू कमी होऊ शकतात. प्रसूतीनंतर होणाऱ्या मातामृत्यूंचे प्रमाणही जास्त असल्याने त्याकडे आणखी लक्ष पुरविण्याची गरज आहे. भारतात गर्भपात कायदेसंमत असला, तरी अजूनही पुष्कळ स्त्रिया असुरक्षित गर्भपाताचा मार्ग अनुसरतात. गर्भपात चुकीच्या मार्गाने केल्यास त्याचा परिणाम स्त्रीच्या आरोग्यावर होतो. गर्भपाताच्या सुविधांचे जाळे सर्वदूर पसरले, तर त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यात यश येईल. या सर्व बाबी खेड्यापाड्यांतील गरीब, अशिक्षित स्त्रियांपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे, कारण याच स्त्रिया आरोग्याच्या सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. अधिक गरोदरपणांचा धोका स्त्रीला होणाऱ्या मुलांची संख्याही महत्त्वाची आहे. अधिक मुले म्हणजे अधिक गरोदरपण आणि अधिक गरोदरपण म्हणजे मातामृत्यूचा अधिक धोका. म्हणजेच होणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली, तर मातामृत्यूही कमी होतील. कुटुंबाचा आकार कमी होण्यासाठी आपण गेली ६० वर्षे झगडत आहोत. आणखी मुले नको असलेली; परंतु कुटुंबनियोजनासाठी कुठलीही पद्धत न वापरणारी जोडपी आपल्याकडे पुष्कळ आहेत. याचा अर्थ योग्य आणि मानवेल अशी कुटुंबनियोजन पद्धती त्यांच्यापर्यंत पोचत नाही. ही उणीव भरून निघायला हवी.
भारतीय स्त्रियांमधील "ऍनिमिया'चे प्रमाण ५० टक्के आहे. हेच प्रमाण गर्भवती स्त्रियांत ६० टक्के आहे. मुळातच स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता असल्याने प्रसूतीच्या काळातील गुंतागुंत वाढते. शास्त्रीयदृष्ट्या २१ ते ३४ वर्षे हा प्रसूतीसाठी योग्य वयोगट आहे. म्हणजे वीस वर्षांच्या आतील आणि ३५ वर्षांच्या नंतर होणारे जन्म टाळले पाहिजेत. तसे झाल्यास मातामृत्यूचा धोका कमी होईल. वीस वर्षांच्या आत जन्म नको म्हणजे लग्नाचे वय अधिक हवे आणि ३५ वर्षांच्यावर जन्म नको म्हणजे कुटुंबाचा आकार लहान हवा. शिवाय स्त्रियांचे कुटुंबातील स्थान, निर्णय प्रक्रियेतील सहभाग, आरोग्य सेवांची उपलब्धता आणि त्यांचा वापर, याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विविध राज्यांतील आरोग्याची; तसेच मातामृत्यूंची स्थिती निरनिराळी आहे. याचे कारण विविध राज्ये विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत. मातामृत्यूंच्या स्थितीप्रमाणे पहिली तीन राज्ये आहेत- केरळ, तमिळनाडू आणि महाराष्ट्र; तर शेवटची तीन आहेत राजस्थान, आसाम आणि उत्तर प्रदेश. नमुना सर्वेक्षण पद्धतीनुसार भारताच्या मातामृत्यूसंदर्भातील वरील सर्वच घटक खरे तर परस्परावलंबी आहेत. त्यामुळे यातील कुठल्याही घटकात सुधारणेला सुरवात झाली, की त्याचा परिणाम इतर घटकांतही परावर्तित होईल. त्यानंतर मातामृत्यूचा दर वेगाने खाली येऊन स्थिरावेल.
-डॉ. अंजली राडकर (लेखिका पुणे विद्यापीठात प्राध्यापक आहेत.)

मधुमेही रुग्णांना दिलासा

मधुमेही रुग्णांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
Monday, June 22nd, 2009 AT 5:06 PM
मुंबई - लठ्ठपणा आणि रक्‍तदाब कमी असणाऱ्या मधुमेही रुग्णांना (टाइप टू) उपयुक्‍त असणाऱ्या 'जीएलपी १' किंवा 'बाएटा' या औषधाला अमेरिकन डायबेटिस असोसिएशन आणि युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबेटिस या संस्थांनी संयुक्तरीत्या मान्यता दिली आहे. मधुमेहावर अतिशय गुणकारी असणारे हे औषध जास्तीतजास्त भारतीय रुग्णांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्नही केले जात आहेत.
भारतात ४० दशलक्ष एवढे मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यापैकी ९५ टक्‍के रुग्णांना "टाइप टू' प्रकारचा मधुमेह आहे. लठ्ठपणामुळे पोटात अतिरिक्‍त ऊर्जा साठवली जाते. त्यामुळे चयापचय क्रिया तसेच इन्शुलिनच्या वापरावर त्यामुळे बंधने येतात. अशा वेळी बाएटासारखी औषधे परिणामकारक ठरतात. या औषधामुळे सर्वसाधारणपणे ३० आठवड्यांत पाच पौंडांपर्यंत वजन कमी होऊन रक्‍तातील साखरेवर नियंत्रण राखले जाते, असे सिद्ध झाले आहे.
मधुमेहावर तोंडावाटे तसेच इन्जेक्‍शनद्वारे घेण्याची बरीच औषधे आहेत. या औषधांची मात्रा घेतल्यानंतरही "टाइप टू' रुग्णांच्या रक्‍तातील साखरेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होतेच असे नाही. बाएटा इन्जेक्‍शनने मात्र शंभर टक्‍के परिणाम साधता येतो. ही औषधे इतर औषधांसोबत किंवा काही रुग्णांमध्ये इन्शुलीनसोबतही दिली जातात. भारतीय रुग्णांमध्येही आता या औषधांचा वापर वाढत आहे, असे रहेजा रुग्णालयातील मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांनी सांगितले.
आतड्यांमध्ये नैसर्गिकरीत्या निर्माण होणाऱ्या हार्मोन्सप्रमाणे या औषधांचे कार्य चालते व शरीराला स्वतःचे इन्शुलिन तयार करण्यास मदत होते. हायपोग्लायकेमिया होण्याचा धोका यामुळे खूपच कमी असल्याची माहिती इंडिया डायबेटिस रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. ए. रामचंद्रन यांनी दिली.

आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करा - डॉ. हुबेकर

आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करा - डॉ. हुबेकर
सकाळ वृत्तसेवा
Monday, April 06th, 2009 AT 10:04 PM
भंडारा - आज विज्ञान व तंत्रज्ञानामुळे असाध्य रोगांवर रामबाण औषधींचा शोध लागलेला आहे. परंतु, मनुष्याच्या शारीरिक हालचाली कमी झाल्याने व व्यावसायिक स्पर्धेमुळे प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव वाढलेले आहेत. यामुळे उच्च रक्तदाब, निद्रानाश, मधुमेह, हृदयरोग, व्यसनाधीनता वाढली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य दिनी (ता. सात) प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी आजपासूनच आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी सुवर्णा हुबेकर यांनी केले आहे.
आरोग्य समस्या वेळोवेळी ओळखून त्या सोडविण्यासाठी लक्ष केंद्रित करणे, हा जागतिक आरोग्य दिनाचा उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. 1946 ला रेने सॅड यांच्या अध्यक्षतेखाली 51 राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय समितीने न्यूयॉर्क येथे संघटनेच्या प्रारूपास मान्यता दिली. ही घटना सात एप्रिल 1948 पासून अमलात आणली म्हणून तेव्हापासून सात एप्रिलला वर्धापनदिनानिमित्ताने जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
आजवर जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरण, बालकाचे आरोग्य, कर्करोग, मधुमेह, सकस आहार, हिवताप, अपघात, मानसिक आरोग्य, रक्तदाब, धूम्रपान विरोधी जनजागृती पर्यावरण, वृद्ध व्यक्तीचे आरोग्य, रक्तदान या विषयावर लक्ष केंद्रित केलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार जो व्यक्ती शारीरिक, मानसिक, भौतिकरीत्या तंदुरुस्त आहे तो खरा निरोगी. त्यामुळे प्रत्येकाने मानव समाजावरील आजाराचे आक्रमण थोपविण्यासाठी सक्रिय व्हावे, असेही डॉ. हुबेकर यांनी आवाहन केले.

लहान मुलेही मधुमेहाच्या विळख्यात

लहान मुलेही मधुमेहाच्या विळख्यात
सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 29th, 2009 AT 7:01 PM


(संग्रहित छायाचित्र)

मुंबई - चटपटीत जीवनशैलीला बळी पडल्याने भारतवासीय मधुमेहाच्या विळख्यात सापडले असून चार ते आठ वयोगटातील मुलेही त्यातून सुटलेली नाहीत. प्रामुख्याने टाईप 1 प्रकारच्या मधुमेहाने या मुलांना ग्रासले असून, रक्‍तातील साखरेचे प्रमाण आणि कालेस्टेरोल यांचे वाढते प्रमाण, उच्च रक्‍तदाब यांचा सामना या मुलांना करावा करावा लागत आहे.
इन्सुलीनची निर्मिती करणाऱ्या पेशी कमी झाल्याने किंवा त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्याने टाईप 1 मधुमेह बळावतो. आनुवंशिकता आणि बदललेली जीवनशैली ही प्रमुख कारणे त्यामागे आहेत. डब्यातील भाजी-पोळी, डाळ-भात यांची जागा आता फास्टफूडने घेतली आहे. कॅडबरी चॉकलेटपासून चटपटीत खाद्यपदार्थांवर ताव मारणाऱ्या या निरागस मुलांना या पदार्थांमुळे आपण मधुमेहाला बळी पडतोय, याची कल्पनाही नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका पाहणीत दिसून आले आहे. खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आणि वेळीच योग्य औषधोपचार यांनी मधुमेह आटोक्‍यात आणता येतो.
मुलांमधील मधुमेहाची लक्षणे
जास्त आणि वारंवार भूक लागणे, वजन वाढणे त्यातून स्थूलपणा येणे, लवकर थकवा जाणवणे आणि वारंवार लघवीला जावे लागणे, डोकेदुखी आणि चिडचिड, वैताग यांसारखे वर्तनातील बदल.
उपाय
व्यायाम हा मधुमेहावर रामबाण उपाय आहे. मॉर्निंग वॉक याशिवाय प्राणायाम आणि काही योगासने यांचा चांगला उपयोग होतो. खाणेपिणे योग्य ठेवल्यास त्यावर सहजपणे नियंत्रण ठेवता येते.

मोतीबिंदू म्हणजे काय?

उपचार पद्धतीत अत्याधुनिकतेची कास
सकाळ वृत्तसेवा
Friday, April 17th, 2009 AT 10:04 PM
जळगाव - डोळ्याला मनाचा आरसा म्हटले जाते. राग, लोभ, मद, मत्सर सारे काही या डोळ्यांतूनच व्यक्त होत असते. आपल्या या डोळ्यांमुळेच आपण सुंदर सृष्टी पाहू शकतो. मानवी शरीरातील डोळा हे अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय असून, त्याची योग्य काळजी घेतली जात नाही. असंतुलित आहार आणि सवयींमुळे अलीकडे डोळ्यांचे आजार वाढीस लागले आहेत.
डोळ्यांच्या आजारात वाढ होऊ लागल्याने अकाली म्हणजे मोतीबिंदूसारखे आजार वयाच्या पन्नाशीतच जडू लागले आहेत. हा आजार पूर्वी सत्तरी ओलांडल्यानंतर होत असे. विचित्र सवयी आणि व्यसनाधीनता वाढीस लागल्याने डोळ्यांचे अनेक आजार बळावत आहेत. आहारात पालेभाज्या व फळांचा गरजेपुरताही समावेश होत नाही. परिणामी 30 ते 35 या वयोगटानंतर प्रत्येकालाच डोळ्यांचे आजार जडतात. ते जडू नयेत आपले डोळे कायम निरोगी राहावेत, यासाठी डोळ्यांची आपणच काळजी घ्यायला हवी, असे नेत्रतज्ज्ञांचे मत आहे.
वातावरण बदलाचा परिणाम
डोळे अतिशय नाजूक असतात व त्यावर वातावरणाच्या बदलांचा परिणाम लगेच होतो. त्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. ऋतुचक्र बदलत असताना थंडीकडून उन्हाळ्याकडे जाताना हवामानातील बदलांमुळे काही आजार होतात. त्यात ऍलर्जी, कोरडेपणासारख्या तक्रारी जास्त आढळतात. आता संगणकावर काम करणारे तसेच "कॉन्टॅक्‍ट लेन्स' वापरणारे, उन्हामध्ये सतत काम करणारे लोक लक्ष्य बनू शकतात. त्यामुळे सावधानता बाळगणे हा नेहमीचा योग्य उपाय आहे.
खानदेशात सुविधा
खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबारसारख्या शहरांत एक ते दोन दशकांपूर्वी तज्ज्ञ डॉक्‍टरांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच होती. त्यामुळे कुठल्याही गंभीर आजारावर उपचारांसाठी रुग्णांना पुणे, मुंबई, नाशिकसारख्या मोठ्या शहरांत धाव घ्यावी लागत असे. त्यासाठी रुग्णांना मानसिक, शारीरिक त्रासाबरोबरच आर्थिक झळही सोसावी लागत होती. या तिन्ही शहरांचे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान लक्षात घेता हळूहळू तेथे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे रुग्णांची मोठी सोय होत आहे.
खानदेशातील नेत्र रुग्णालयांत सध्या संगणकीय नेत्रतपासणीसह फेको सर्जरी, फोल्डेबल लेन्स इम्प्लांट, एन-डी याग लेझर ट्रीटमेंट, फंड्‌स फ्लुरेसिन अँजिओग्राफी, ऑटोमॅटिक पेरिमेट्री, रेटिना लेझर ट्रीटमेंट, डायबेटिस रुग्णांसाठी लेझर उपचार- रेटिना सर्जरी, ग्लुकोमा सर्जरी, ऑक्‍युलर ट्रॉमा सर्जरी आदी उपचार केले जातात. तसेच लेसर रूम, पेरिमेट्री रूम आदी सुविधाही उपलब्ध आहेत. अलीकडेच या तिन्ही शहरांतील काही नेत्रतज्ज्ञांकडे अत्याधुनिक ओझील फेको शस्त्रक्रिया केल्या जाऊ लागल्या आहेत. पारंपरिक फेको शस्त्रक्रियेतील काही त्रुटी भरून काढण्यासाठी या तंत्रज्ञानात बरेच संशोधन झाले आहे. ओझील तंत्रज्ञानात सुरक्षितता, परिणामकारकता व शस्त्रक्रियेचा वेग यांचा सुंदर मिलाफ साधला जातो. यामुळे स्थानिक स्तरावरच सर्व सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना पुणे- मुंबईसारख्या मोठ्या शहरांत जाण्याची गरज राहिलेली नाही.
मधुमेह, रक्तदाबाचा परिणाम
मधुमेह, रक्तदाब या आजारांमुळे डोळ्यांवरही विपरीत परिणाम होतो, याची अनेकांना माहितीच नाही. त्यामुळे अशा रुग्णांनी वर्षभरात एकदा डोळ्यांची तपासणी करायलाच हवी. अशा तपासणीत डोळ्यांमध्ये काही दोष आढळल्यास त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा डोळे कायमचे गमावण्याची भीती असते. तसेच लहान मुलांना खेळताना, तसेच शाळेत विविध साधने हाताळताना डोळ्यांना होणारी इजा, या विषयीही जनजागृतीची गरज आहे.
इतर औषधांचा परिणाम
आजकाल रोजच्या जीवनात हे लक्षात आलेय, की वेगवेगळ्या कारणांसाठी आपण अनेक औषधे घेतो आणि त्या औषधांचा आपल्या डोळ्यांवर कळत-नकळत परिणाम होत असतो. यावर आता संशोधन चालू आहे. कोणतीही स्टेरॉइड्‌स जास्त दिवस घेणे गरजेचे असेल, तर त्या उपचारानंतर निदान एकदा तरी डोळ्यांच्या डॉक्‍टरांना दाखवून घ्यायला हवे. डॉक्‍टरांना तुम्ही घेत असलेली औषधांची यादी दाखविणे तितकेच महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्यात काळजी हवीच
वसंत ऋतूमध्ये आंबा-डाळ, कैरीचे पन्हे पिताना रोज भरपूर पाणी पिणे, उन्हात जाताना डोक्‍यावर टोपी घालणे, डोळ्यांवर गॉगल लावणे अत्यावश्‍यक आहे. घरात लहान मुले असतील व ती सतत डोळ्यांना खाज येते, पाणी येते, डोळे लाल होतात, अशा तक्रारी करत असतील, तर त्यांना त्वरित जवळच्या डोळ्यांच्या डॉक्‍टरांना दाखवून घ्या. त्यामुळेच उन्हाळ्याची सुटी आपण चांगली घालवू शकतो. आपला आहार-विहार आणि विचार या सर्वांनीच आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवू या आणि उन्हाळ्यापासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करू या.
मासे खा, मोतीबिंदू टाळा
एका संशोधनानुसार दीर्घायुष्य मिळण्याबरोबरच नेत्रविकार टाळण्यासाठीही मासे महत्त्वाचे आहेत. विशेषतः मोतीबिंदू टाळण्यासाठी, रेटिनाची क्षमता वाढवण्यासाठी मत्स्याहार चांगला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आठवड्यातून केवळ एकदाच मत्स्याहार करणाऱ्या व्यक्तींमध्ये दृष्टी जाण्याची किंवा रेटिनावर पडदा येण्याची शक्‍यता 40 टक्‍क्‍यांनी कमी असते, तर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये ही शक्‍यता दुप्पट असते. शरीरातील रेटिनाचे प्रमाण जसे कमी होत येईल तशी मोतीबिंदू होण्याची शक्‍यता वाढते. त्यामुळेच जास्तीत जास्त मासे खाऊन मोतीबिंदूला दूर ठेवणे, हेच जास्त योग्य ठरते.
मोतीबिंदू म्हणजे काय?
डोळ्यातील नैसर्गिक भिंगास आलेला गढूळपणा म्हणजेच मोतीबिंदू. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग (लेन्स) पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते. मोतीबिंदू अर्थात लेन्सला आलेला गढूळपणा काळानुसार वाढतच जातो व रुग्णास अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागते. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया खूपच सुकर झाली आहे.

'सह्याद्री' मध्ये मधुमेहासाठी अत्याधुनिक उपचार केंद्र

'सह्याद्री' मध्ये मधुमेहासाठी अत्याधुनिक उपचार केंद्र
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 03rd, 2009 AT 11:06 PM

गणेश कला क्रीडा मंच - सह्याद्री रुग्णालयाच्या बिबवेवाडी शाखेतील 'सेंटर ऑफ एक्‍सलन्स फॉर डायबेटिस'चे उद्‌घाटन रुग्णांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे - मधुमेही रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या साह्याने उपचार करण्यासाठी सह्याद्री रुग्णालयाच्या बिबवेवाडी शाखेमध्ये 'सेंटर ऑफ एक्‍सलन्स फॉर डायबेटिस' सुरू करण्यात आले आहे. वीस वर्षांपेक्षा अधिक काळ मधुमेह असलेल्या आणि नियमित व्यायाम करणाऱ्या रुग्णांच्या हस्ते या केंद्राचे नुकतेच औपचारिक उद्‌घाटन करण्यात आले.
या प्रसंगी सह्याद्री रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. चारू आपटे, डॉ. जयश्री आपटे, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप काळे उपस्थित होते. या केंद्राच्या प्रमुख मधुमेह तज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक डॉ. शैलजा काळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
त्या म्हणाल्या, 'देशातील झपाट्याने वाढणाऱ्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागृती करणे आवश्‍यक आहे. यासाठी हे अत्याधुनिक केंद्र सुरू करण्यात आले आहे. आनुवंशिकता, व्यायामाचा अभाव, ताण आणि आहार ही मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. मधुमेहाची शक्‍यता असणाऱ्यांना यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या केंद्रातर्फे करण्यात येणार आहे. जुना मधुमेह असलेल्या रुग्णांना मूत्रपिंडविकार, हृदयविकार, न्यूमोनिया असे दुष्परिणाम होतात. त्यांची विशेष काळजी घेण्याची सुविधा या केंद्रात उपलब्ध करण्यात आली आहे. मधुमेह प्रशिक्षणासाठी स्वतंत्र विभागही यात सुरू करण्यात आला आहे.
'मधुमेहामुळे पायाला होणाऱ्या जखमांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत उपकरणे या केंद्रात आहेत. डोळ्यांसाठी स्वतंत्र विभाग आणि अद्ययावत अतिदक्षता विभागही येथे आहे,'' असे त्यांनी सांगितले.
मधुमेहावरील संशोधनही या केंद्रात सुरू आहे. याबाबत माहिती देताना डॉ. काळे म्हणाल्या, 'मधुमेही रुग्णांच्या पायांच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी येथे संशोधन सुरू आहे. 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (आयसीएमआर) अंतर्गत मधुमेहींच्या गुणसूत्रांची तपासणी करण्याचेही संशोधन सुरू आहे.''
मोफत तपासणी शिबिर
'सेंटर ऑफ एक्‍सलन्स फॉर डायबेटिस'तर्फे येत्या 10 ते 20 जूनला सह्याद्री रुग्णालयाच्या बिबवेवाडी शाखेत आठशे मधुमेही रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी 9673338063 किंवा 9673338179 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फास्ट फूड आणि आहाराचे असंतुलन

फास्ट फूड आणि आहाराचे असंतुलन
Saturday, June 06th, 2009 AT 12:06 PM


आजकाल हॉटेलिंग करणे ही चैनीची किंवा नावीन्यपूर्ण गोष्ट राहिलेली नाही. आबालवृद्धांपासून सगळ्याच वयोगटातील लोक या गोष्टीस सरावलेले आहेत. फास्ट फूड आवडणाऱ्यांचा एक नवीन गट तयार झाला आहे. कदाचित कित्येकांनी आपला समतोल आहार सोडून दिनक्रमात त्याचा समावेश केला आहे. ही परिस्थिती थोड्याफार फरकाने घरोघरी आढळते. अशी ही फास्ट फूड सर्व्ह करणारी सेंटर्स आता कानाकोपऱ्यात आढळतात. याला कारण म्हणजे, या पदार्थांची "रेडी टू सर्व्ह' अशी जाहिरात केली जाते. मधल्या वेळचे खाणे किंवा मुलांचे टिफिन किंवा मुख्य जेवणाला पर्याय म्हणूनही या पदार्थांकडे पाहिले जाते. हे फास्ट फूड कशाचे बनलेले असते, ते आरोग्यवर्धक आहे का, हे प्रश्‍न नक्कीच उपस्थित करावेत असे वाटते.
फास्ट फूड हे प्रामुख्यानी प्राणिजन्य स्निग्ध पदार्थ (चीज, चरबी, खारवलेले लोणी), मीठ, साखर, अजिनोमोटो, रिफाइंड फ्लोअरपासून बनलेले असतात. यात अतिशय आवडीने खाण्यात येणारे पदार्थ म्हणजे नूडल्स, बर्गर, पिझ्झा, ब्रेड, बन इ. या पदार्थांसोबत शीतपेये घेतली जातात. यातून रिकामे उष्मांक शरीराला मिळतात. तसेच ही सवय लहानपणापासून लागली तर ती एकच चव मुलांना आवडायला लागते.
विशेष करून 5 ते 15 वयोगटातील मुलांसाठी हा प्रश्‍न गंभीर स्वरूप धारण करू शकतो. वाढीच्या वयातील चुकीचे खाणे या मुलांना त्रासदायक ठरू शकते. फास्ट फूड हे प्रामुख्याने रिफाइंड पदार्थांपासून बनलेले असतात. यात कोंडा (आहारातील एक आवश्‍यक घटक) नसतो. या पदार्थांमध्ये स्निग्धांम्लांचा अतिरेकी वापर केला जातो. यात भाज्या, फळे, सालीयुक्त डाळी, कोंडायुक्त धान्याचे पीठ यांचा वापर केलेला नसतो. भारतासारख्या शेतीप्रधान देशात जिथे भाज्या, फळफळावळ भरपूर प्रमाणात पिकविले जाते, अशा ठिकाणी या पदार्थांची चलती व्हावी, ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे.
या सदोष आहारपद्धतीचे फलित म्हणजे अनावश्‍यक वाढणारे वजन, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, आतड्याचे रोग, पोटाचे विकार इ. व्याधींना आमंत्रण देणारे घटक या आहारात भरपूर प्रमाणात असतात. पौष्टिकतेला लागणारा समतोलपणाचा अभाव असल्यामुळे असा आहार आरोग्यवर्धक होऊ शकत नाही. यातील प्राणिजन्य मेदामुळे हृदयरोग, मधुमेह, अनावश्‍यक वाढणारे वजन इ. व्याधी उद्‌भवू शकतात. यातील मिठाचे प्रमाण अतिरिक्त रक्तदाबाला आमंत्रण देणारे ठरू शकते. या आहारातील कोंड्याच्या अभावी आतड्याची दुखणी, कर्करोग, पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. तसेच जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हे रोग गंभीर रूप धारण करू शकतात. हा धोका टाळायचा असेल तर आहारपद्धतीत सुधारणा करणे जरुरीचे आहे.
फास्ट फूड हे लोण पाश्‍चात्त्य देशांतून आलेले असले तरी अमेरिकन सरकारपुढे आलेल्या वैद्यकीय रिपोर्टवरून अमेरिकेत हृदयरोग, आतड्याचे रोग, मधुमेह, कर्करोग यांसारख्या रोगांमुळे आलेले मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. हे रोग आणि आहार यांचा निकटचा संबंध आहे.
अमेरिकन सरकारने याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आहार कसा असावा याबाबत प्रसार केला. भारतातही अशाप्रकारे काही मोहीम राबविण्याची गरज आहे असे वाटते. नाही तर चुकीच्या आहारपद्धतीचे फलित म्हणून व्याधिग्रस्त पुढची पिढी तयार व्हायला वेळ लागणार नाही. आहारात होत असलेला हा बदल चांगला नसून वाईट आहे, हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.
दारिद्य्ररेषेखालील लोकांना परिस्थितीअभावी कुपोषण आहे, तर सधन वर्गात "खाऊन-पिऊन उपाशी' असा एक वर्ग चुकीच्या आहारापद्धतीमुळे व आहाराविषयक अज्ञानामुळे फोफावतो आहे. आधीच अनेक प्रक्रिया केलेले अन्न आपल्यापर्यंत पोचते. त्यात चुकीच्या आहारपद्धतीचे फलित म्हणून आरोग्याच्या समस्या उद्‌भवण्यास वेळ लागणार नाही. यासाठी प्रत्येकाने आपला आहार तपासून पाहणे आता निकडीचे झाले आहे.
- मृणाल सुरंगळीकर
(आहारतज्ज्ञ, नागपूर)