जोडगोळी रक्तदाब आणि मधुमेहाची!
Thursday, June 11th, 2009 AT 12:06 PM
रक्तदाब आणि मधुमेह हे दोन शब्द असे आहेत, की जे ऐकलं तरी पोटात गोळा उभा राहतो. त्यातच हे दोन्ही आजार असले, तर काही खैर नाही, असा समजही असतो. किंबहुना म्हणूनही असेल कदाचित; पण या दोन्ही रोगांविषयी अनेक समज-गैरसमज दिसून येतात. त्यापैकी काहींची झलक प्रथम पाहूया.
एखादी व्यक्ती नर्व्हस किंवा हायपर ऍक्टिव्ह झाली, तर तर उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, असं मानलं जातं; पण ते तसं नसतं. मधुमेह बरा करता येणं ही गोष्ट अशक्य असली तरी तो नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. तसंच रक्तदाबाचंही आहे. नियमित आहार आणि व्यायामामुळे रक्तदाबही आटोक्यात ठेवता येऊ शकतो; शिवाय आपली जीवनशैली बदलून रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
रक्तदाबाचा विकार किंवा मधुमेह बरा होऊ शकतो, अशातला भाग नाही; पण काही उपायांमुळे हे विकार नियंत्रणात येण्यासाठी मदत होऊ शकते. ते उपाय आहेत तरी कोणते?
* वजन प्रमाणाबाहेर वाढलं असेल, तर ते नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा.
* घरच्या घरी किंवा जिममध्ये जाऊन नियमितपणे व्यायाम केलात, तर आपोआपच वजनाचा काटा योग्य आकड्यावर स्थिरावेल.
* आपला आहार समतोल राहील आणि तो वेळच्या वेळी घेता येईल, याची काळजी घ्यायला हवी. आपल्या आरोग्याला आवश्यक असणाऱ्या आहाराचा तक्ता आपल्या डॉक्टरांकडून किंवा आहारतज्ज्ञांकडून आखून घ्यावा.
* कोलेस्ट्रॉलवरचं नियंत्रण, मीठ कमी खाणं यामुळे फिजिकली ऍक्टिव्ह राहता येतं.
* अतिरिक्त मद्यपान करू नका.
* डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचं नियमितपणे सेवन करा.
* मधुमेहाचा त्रास होत असेल, तर नियमित व्यायाम आणि योग्य आहाराचा समतोल राखायला हवा.
* व्यायाम केल्यामुळे शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण कमी राहायला मदत होऊ शकेल.
* आवश्यकतेनुसार इन्शुलिन आणि ग्लुकोजचा वापर जरूर करावा.
* डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अतिरिक्त वजनावर नियंत्रण ठेवायला हवं.
* नियमित व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरण वाढण्यास मदतच होते.
* ऍरोबिक्ससारख्या ऍक्टिव्हिटीज केल्यानं हृदयाची क्षमता वाढते.
* नियामित व्यायाम केल्यानं बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढते आणि परफॉर्मन्स चांगला होतो.
* हलकं वर्कआऊट केल्यानं शरीरातल्या ग्लुकोजचा योग्य रीतीनं वापर केला जातो.
* मधुमेही असणाऱ्यांनी कर्बोदक असलेले पदार्थ खाणं टाळावं.
मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना काही बाबी आठवणीनं आणि अगदी दक्षतेनं करणं गरजेचं असतं. नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जिमला जात असाल, तर ती चांगलीच गोष्ट आहे; पण जिममध्ये जाऊन व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. तसंच जिम इन्स्ट्रक्टरलाही आपल्या आजाराची कल्पना दिली, की तो त्यानुसार व्यायाम प्रकार सांगू शकेल.
व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी आणि नंतर रक्तातल्या साखरेचं प्रमाण तपासून घ्यावं. लो इन्टेसिटीचे वर्कआऊट ट्राय करता येतील. व्यायाम करताना वर्कअप एक्सरसाइज करणं अनिवार्य ठरतं. व्यायामाला प्रारंभ करताना सुरुवातीलाच एकदम अवघड व्यायामप्रकार न करता सोपेसे व्यायामप्रकार आधी शिकून घ्या.
असलेल्यांच्या पावलांपर्यंत रक्ताभिसरण नीट होत नाही, अशी तक्रार कायम असते. व्यायाम केल्यानं ते सुरळीत होऊ शकतं. व्यायाम करताना किंवा करून झाल्यावर अशक्तपणा जाणवत असेल तर किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर अतिव्यायाम करणं किंवा मनावर ताण घेण्याचं टाळावं. आपली औषधं नियमितपणे आणि न चुकता घ्यावीत. कदाचित औषधं वेळेवर न घेण्यानंही हे दुष्परिणाम होऊ शकतात.
जिममध्ये जाणं जमत नसेल, तर घरच्या घरीच मात्र रोजच्या रोज व्यायाम करता येईल. तेही शक्य नसेल, तर मोकळ्या हवेत किंवा पार्कात फिरायला जा. हृदयावर अतिरिक्त ताण येईल एवढा व्यायाम अजिबात करू नका. व्यायाम केल्यावर नाडीचे ठोके नियमित व्हायला मदत होण्यासाठी कूलिंग डाऊन एक्सरसाइज करणं अतिशय गरजेचं आहे.
तेव्हा रक्तदाब आणि मधुमेह टाळण्यासाठी योग्य ते आहार-विहार व व्यायाम करा आणि सुदृढ व्हा.
- आभा नवरे